विविध नागरी सुविधांबाबत सुमारे २८९ हरकतींवर सविस्तर चर्चा
देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या प्रारुप विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज, शंका आणि हरकतींवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली विशेष सभा लोकशाही संवादाचे एक आदर्श उदाहरण ठरली. देवरुख नगरपंचायत हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत रस्ते रुंदीकरण, बाजारपेठेची पुनर्रचना, पार्किंग आरक्षण आणि विविध नागरी सुविधांबाबत सुमारे २८९ हरकतींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकास आराखडा राबवताना शहरातील परंपरा आणि सर्वसामान्यांचे हित जपले जाईल, तसेच पर्यायी शासकीय जागांचा वापर करून खासगी मालमत्तांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आमदार निकम यांनी यावेळी दिली.
या बैठकीत केवळ विकास आराखडाच नव्हे, तर देवरुख आगाराशी संबंधित एसटी बसच्या समस्या, कर्मचारी वर्तन आणि वेळेचे नियोजन यावरही नागरिकांनी आक्रमक भूमिका मांडली. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. सोबतच, घरगुती गॅस वितरणातील अनियमितता, ‘ओटीपी’ची समस्या आणि कार्यालयातील असुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित गॅस वितरक व अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, तहसीलदार अमृता साबळे, उपनगराध्यक्ष वैभव पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकभावनांचा आदर करत शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्याचे आश्वासन निकम यांनी दिल्याने नागरिकांनी या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.






