GRAMIN SEARCH BANNER

पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Gramin Varta
199 Views

पाली : महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस रायगड अंतर्गत रत्नागिरी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेबद्दल भारत सरकारचे मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलातील त्यांच्या प्रदीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवेची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुष्पलता दिघे यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विभागांमध्ये अत्यंत आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या महामार्ग पोलीस सुरक्षा विभागात कार्यरत असताना त्यांनी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘शून्य अपघात मोहिमे’सारखे प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबवले. यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी मोहिमेत माहिती संकलनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच गुन्हे शाखेमध्ये असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

विशेषतः ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत पीडित महिला व मुलींची सुटका करणे, तसेच ‘ऑपरेशन स्माईल’च्या माध्यमातून अपहरण झालेल्या बालकांना शोधून त्यांना पुन्हा कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या कामात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. अनैतिक मानवी तस्करी आणि बालकामगार विरोधी मोहिमांमधील त्यांच्या कामगिरीची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालक आणि गृह विभागातर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3225170
Share This Article