GRAMIN SEARCH BANNER

खेड: हेडलाईटच्या वादातून एसटी चालकाला बेदम मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
536 Views

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सोमवारी पहाटे एका एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेले वृत्त असे की, रोहा आगाराचे चालक शरद महादेव माने (वय ४२) हे सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एसटी बस (क्र. एमएच-१४-केक्यू-३९७०) घेऊन चिपळूणकडून खेडकडे येत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मागील बाजूस आले असता, समोरून येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा (क्र. एमएच-४६-एयू-३७१७) कारच्या चालकाने अचानक प्रखर हेडलाईट थेट एसटी चालकाच्या डोळ्यावर मारली.

माने यांनी अप्पर-डिप्पर करून प्रकाशाची तीव्रता कमी करण्याचा इशारा दिला, तरीही कार चालकाने हेडलाईट कमी केले नाही. माने आपली एसटी बस हळुवारपणे खेड बस स्थानकाकडे नेत असताना, संतापलेल्या कार चालकाने आपली गाडी एसटी बसच्या आडवी लावली. कारमधून उतरलेल्या सनी संजय नलावडे आणि कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) यांनी माने यांना काहीही न विचारता थेट गाडीतून ओढून खाली पाडले. त्यानंतर माने यांना लाथाबुक्क्यांनी व हाताच्या चापटांनी कानाखाली बेदम मारहाण केली. या हल्ल्यात माने यांच्या उजव्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शरद माने यांच्या फिर्यादीनुसार, खेड पोलिसांनी सनी नलावडे आणि कौस्तुभ पाटणे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३२, ३५२, ११५(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती खेड पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण शिरगावकर यांनी दिली.

Total Visitor Counter

3347499
Share This Article