देवरूख:संगमेश्वर तालुक्यातील देवरूख परशुरामवाडी येथील जंगलमय भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर देवरूख पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू, दारू तयार करण्याचे रसायन आणि इतर साहित्यासह एकूण ४७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दारू गाळणाऱ्या एका वृद्ध मजुराला पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहात पकडले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास देवरूख परशुरामवाडी येथील जंगलात, बांबर पाऱ्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तेजस मारुती देशमुख व त्यांच्या पथकाने या दुर्गम जंगल भागात छापा टाकला. या वेळी संशयित आरोपी यशवंत शिवराम बेटकर (वय ६०, व्यवसाय- मोलमजुरी, रा. मेघी बौद्धवाडी, संगमेश्वर) हा कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी लावून दारू गाळताना रंगेहात मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४७,६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ६ हजार रुपये किमतीची ६० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू (२० लिटर मापाचे तीन कॅन), ४० हजार रुपये किमतीचे ८०० लिटर गूळ व नवसागर मिश्रित कुजके रसायन (२०० लिटर मापाचे चार प्लास्टिक बॅरल), १,१०० रुपये किमतीचे ५० लिटर उकळते रसायन असलेले पत्र्याचे बॅरल, पाण्याचा ॲल्युमिनियमचा डेग आणि लाकडी चाटू या साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तेजस देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ जून रोजी दुपारी २.४७ वाजता देवरूख पोलीस ठाण्यात आरोपी यशवंत बेटकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






