राजापूर / प्रतिनिधी : क्षणभराचा निष्काळजीपणा आणि समोर उभा ठाकलेला मृत्यू… पण नियतीने जणू सात भाविकांना नवजीवनच दिले. राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी घडलेल्या एका थरारक घटनेत पुण्यावरून दर्शनासाठी आलेल्या सात भाविकांचे प्राण अक्षरशः मुठीत आले होते. त्यांच्या कारने ५० फूट खोल दरीच्या दिशेने घसरत जात मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली; मात्र दाट रानवेली आणि झुडपांनी जणू देवदूताचे रूप धारण करत वाहनाला आधार दिला आणि सातही जणांना काळाच्या दाढेतून परत आणले.
पुण्यातील हे भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शन आणि समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते परतीच्या तयारीत होते. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पांगरे पुलालगत उभी केलेली त्यांची कार सुरू करण्यात आली. मात्र हँडब्रेक व्यवस्थित ओढला गेला नसल्याने वाहन अचानक मागे सरकू लागले आणि काही क्षणांतच नियंत्रणाबाहेर गेले.
कार मागे सरकत असल्याचे लक्षात येताच वाहनातील सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले. कारण वाहनाच्या मागे होती तब्बल ५० फूट खोल दरी आणि तळाशी मोठमोठे दगड. काही क्षणांत कार दरीच्या दिशेने घसरत गेली आणि तिचा बहुतांश भाग हवेत झुकला. मृत्यू समोर दिसत असतानाच वाहन दाट झुडपांमध्ये आणि रानवेलींमध्ये अडकले. त्या काही वेलींनी जणू सात जीवांचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि भीषण अपघात टळला.
जीव वाचवण्यासाठी वाहनातील सर्वांनी प्रसंगावधान राखत पुढील दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. एकामागोमाग एक सर्वजण सुरक्षित बाहेर आले. बाहेर पडल्यानंतर दरीच्या काठावर अडकलेल्या कारकडे पाहताच त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. कारण वाहनाने आणखी एक फूटही सरकले असते किंवा एक पलटी घेतली असती, तर ते थेट दरीत कोसळले असते आणि मोठी जीवितहानी झाली असती.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. कार ज्या अवस्थेत दरीच्या टोकावर लटकत होती ते दृश्य पाहून अनेकांच्या तोंडून नकळत “देवानेच वाचवले” असे शब्द बाहेर पडले. काही क्षणांचा हा थरार सात भाविक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयुष्यभर विसरता न येणारा ठरला.
रानवेली ठरल्या देवदूत
ज्या रानवेली आणि झुडपांकडे सामान्यतः कोणी लक्ष देत नाही, त्याच रानवेली या प्रसंगी सात जीवांसाठी देवदूत ठरल्या. त्यांच्या आधारामुळेच कार दरीत कोसळण्यापासून थांबली आणि सात कुटुंबांवर ओढवणारे दुःख टळले. त्यामुळे पांगरे परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून, “रानवेली नसत्या तर आज सात जणांचा दुर्दैवी अपघात झाला असता,” अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
राजापूर: ५० फूट खोल दरीत कोसळण्यापासून रानवेलीनी वाचवले 7 जणांचे प्राण







