रत्नागिरी (प्रतिनिधी):शहरात मालमत्तेच्या वादातून एका महिलेवर लाकडी पट्टीने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कर्ला येथील किस्मत कॉलनीमधील घर क्रमांक ७०२ येथे घडली. या प्रकरणी आरोपी तमन्ना जमीर मजगावकर हिच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समिना सऊद मजगावकर (वय ४८) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तमन्ना मजगावकर फिर्यादीच्या घरी आली. तिने “हे घर माझे आहे, तुम्ही घरातून बाहेर जा” असे बोलून मोठमोठ्याने ओरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे घर तिच्या पतीने बांधलेले असल्याचा दावाही तिने केला. यावेळी, आरोपी तमन्ना हिने समिनाच्या सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आरोपीच्या हातात लाकडी पट्टी (रीप) होती. फिर्यादी समिना यांनी तिला शिवीगाळ न करण्यास सांगितले असता, आरोपीला त्याचा राग आला. रागाच्या भरात तिने तिच्या हातातील लाकडी पट्टीने समिना यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले. इतकेच नाही तर, “तुला बघून घेते” अशी धमकीही तिने दिली.
या घटनेनंतर, पोलिसांनी फिर्यादी समिना मजगावकर यांच्या तक्रारीवरून तमन्ना हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.