दापोली: दापोली तालुक्यात सुरू असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे हर्णै येथील दोन घरांवर झाड पडून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हर्णै येथील महालदार आणि शबीरा सारंग यांच्या घरांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, केवळ घरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल अधिकारी अक्षय पाटील यांनी केला आहे.
दापोलीतील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळच्या वेळी सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के होती, तर दुपारपर्यंत ती ८२ टक्क्यांपर्यंत खाली आली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत २५.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.