खेडशी येथे रखरखत्या उन्हात जखमी अवस्थेत विव्हळणाऱ्या बैलाला पोलिसांनी दिला माणुसकीचा निवारा

Gramin Varta
131 Views

रत्नागिरी : भर दुपारचे रखरखते ऊन…. पायाला गंभीर जखम झाल्याने वेदनेने विव्हळणारा बैल… आणि रस्त्यावर सांडलेला रक्ताचा सडा… त्याच्या बाजूने वेगाने धावणारी वाहनांची गर्दी. या सगळ्यात माणुसकीचा हात पुढे आला तो रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचा आणि प्राणीप्रेमींचा.

मिऱ्या नागपूर महामार्गावर खेडशी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पायाला गंभीर दुखापत झालेला बैल रस्त्यावर विव्हळत पडला होता. जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. तडफडणाऱ्या या मुक्या प्राण्याकडे अनेक वाहनचालकांनी पाहिले; मात्र मदतीसाठी थांबण्याची तसदी फारशी कोणी घेतली नाही.

दरम्यान, ही माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बैलाला रस्त्याच्या मधोमध तसेच सोडून न देता त्याला काळजीपूर्वक रस्त्याच्या कडेला घेतले. पायातून रक्त वाहत असलेल्या या बैलाची अवस्था पाहून पोलिस हळहळले आणि त्यांनी प्राणीप्रेमींनी मदतीने वाहनांमधून पाणी आणले आणि त्याला पाजले.

मात्र रखरखत्या उन्हामुळे बैलाची अवस्था आणखी बिकट होऊ नये, यासाठी पोलिसांनी जागेवरच तात्पुरता निवारा उभारला. चारही बाजूंना खांब उभे करून त्यावर प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून या मुक्या जीवाला काही काळ का होईना, दिलासा मिळाला.

माणसांच्या गर्दीत माणुसकी हरवत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना, एका मुक्या जीवासाठी पोलिसांनी दाखवलेली ही संवेदनशीलता निश्चितच कौतुकास्पद ठरली. जखमी अवस्थेत विव्हळणाऱ्या बैलाला मदतीचा हात देत पोलिसांनी केवळ आपले कर्तव्य बजावले नाही, तर माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.

Total Visitors :
4825678
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *