GRAMIN SEARCH BANNER

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: लोकल ट्रेनमध्येही एसी असणार, दरवाढ नाही; त्याच दरात प्रवास

Gramin Varta
19 Views

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबई लोकल ट्रेनमध्ये मेट्रोसारखे वातानुकूलित (AC) कोचेस उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रवाशांना या सुविधेसाठी तिकीटदरात वाढ होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या एसी कोचेसमध्ये बंद होणारे दरवाजे असतील. हे कोचेस पूर्णपणे नवे असतील, यात रेट्रोफिटिंग नसेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात ते बोलत होते.

मुंब्रा येथे अलीकडेच झालेल्या मोठ्या रेल्वे दुर्घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकल ट्रेनमध्ये दरवाजे नसल्यामुळे अपघात घडत आहेत. लोक दाटीवाटीने प्रवास करत असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून एसी कोचेसची संकल्पना पुढे आली आहे.

त्यांनी सांगितले की, मेट्रोमध्ये दरवाजे बंद होतात आणि वातानुकूलित प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखदायी होतो. या अनुभवासारखा प्रवास लोकल ट्रेनमध्येही मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल आणि हे नवे कोचेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. हे कोचेस उच्च दर्जाचे असतील आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होईल.

मुख्यमंत्र्यांनी याशिवाय मेट्रो प्रकल्पांवरही भाष्य करत सांगितले की, कुलाबा ते आरे मार्ग ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस पूर्णतः कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रोळी-मंडाले आणि ठाणे-कल्याण या मार्गांसह एकूण १३ मेट्रो मार्गांवर काम वेगाने सुरू आहे.

याशिवाय एक एकात्मिक तिकीट प्रणाली लवकरच लागू करण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांना एकाच तिकीटावर मेट्रो, लोकल, मोनोरेल, बेस्ट आणि जलवाहतूक सेवा वापरता येणार आहेत. हे तिकीट व्हॉट्सअ‍ॅपवरही उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3072698
Share This Article