रत्नागिरी : मिरकरवाडा येथील पठाणवाडी येथे राहणाऱ्या एका अस्थमाच्या रुग्णाचा आकडी येऊन मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धिजय कुमार (वय ३८, मूळ रा. गोड्डा, झारखंड) हा गेल्या काही काळापासून रत्नागिरीतील मिरकरवाडा, पठाणवाडी येथे राहत होता आणि हेमंत रामचंद्र जाधव यांच्याकडे कामाला होता. संतोषला दम्याचा (अस्थमाचा) जुनाट आजार होता आणि तो त्यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार घेत होता.
२० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास, त्याचा सहकारी किशोर कुमार त्याला उठवण्यासाठी गेला असता, संतोषला आकडी आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ हेमंत जाधव यांना फोन करून माहिती दिली. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संतोषला रुग्णवाहिकेतून रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी : मिरकरवाडा येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू
