छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावरून पडून मुरलीधर चांदगुडे, त्यांच्या पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुरुवातीला कुणालच्या हट्टातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेकडे पाहिले जात असताना आता कुटुंबातील जुन्या वादांच्या चर्चेमुळे या प्रकरणाला नवा आयाम मिळाला आहे. विशेष म्हणजे तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र न करता मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह त्यांच्या माहेरी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोस्टमार्टमनंतर तिन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह अंबड तालुक्यातील धनगरपिंपळगाव येथील शिवलाल वस्ती परिसरातील शेतात नेण्यात आला. शुक्रवारी रात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह मुकुंदवाडी या संगीताच्या माहेरी नेण्यात आले आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घटनेत मृत्यू झालेल्या तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याने कुटुंबातील संबंधांबाबत चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, मुरलीधर यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील काही जमीनवाटपावरूनही मतभेद असल्याची चर्चा आहे. मुरलीधर यांच्या वडिलांनी तीन एकर जमिनीव्यतिरिक्त काही जमीन त्यांच्या तीन मुलींना, म्हणजेच मुरलीधर यांच्या बहिणींना दिल्याचे सांगितले जात आहे. याच जमिनीच्या मुद्द्यावरून मुरलीधर आणि संगीता यांच्यात वाद होत असल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला आहे. या कौटुंबिक वातावरणाचा कुणालवर परिणाम झाला होता आणि तो नैराश्यात असल्याची चर्चाही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर आता मृत संगीता चांदगुडे यांच्या बहिणी आणि कुणालच्या मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी समोर येत वेगळाच दावा केला आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मुरलीधर यांनी घर आणि शेत सोडावे, यासाठी त्यांच्या डोक्यात फावड्याने वार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी, त्यावेळी मुलाच्या जीवाचा विचार का केला गेला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र, हे आरोप त्यांच्या बाजूने करण्यात आलेले असून त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मुरलीधर यांच्या आईने यापूर्वी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले होते. संगीता यांनी मुरलीधर यांना सुमारे २० वर्षांपासून कुटुंबापासून दूर ठेवल्याचा आणि नातेवाईकांशी संवाद साधू दिला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, संगीताच्या माहेरच्या नातेवाइकांकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे चांदगुडे कुटुंबातील जुने वाद, जमीनवाटप, कौटुंबिक संबंध आणि तिन्ही मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर परस्परविरोधी दावे समोर येत आहेत.
खवड्या डोंगरावरील या घटनेमागे नेमके काय घडले, तिघांचा मृत्यू कशामुळे झाला आणि या घटनेपूर्वी कुटुंबात कोणते वाद होते, याचा उलगडा आता तपासातून होणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीला आयफोनच्या हट्टासह विविध कारणांची चर्चा होत असताना आता कौटुंबिक कलहाची पार्श्वभूमीही तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस या सर्व बाबींची पडताळणी करून पुढील तपास करीत आहेत.
खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; अंत्यसंस्कार वेगवेगळे का? कौटुंबिक वादाच्या चर्चेने तपासाची दिशा बदलली
Leave a Comment




