GRAMIN SEARCH BANNER

भिलारे आयनी ग्रामसेवक हल्ला प्रकरण: पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता, खेड न्यायालयाचा निकाल

Gramin Varta
71 Views

खेड (वार्ताहर): खेड तालुक्यातील भिलारे आयनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकावर धक्काबुक्की केल्याच्या आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्ष आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. यामुळे गेल्या काही काळापासून खेड तालुक्यात चर्चेत असलेल्या या प्रकरणावर पडदा पडला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी भिलारे आयनी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक राहुल राजेंद्र चौधरी यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, सभा सुरू असताना सुनील कुमार राजाराम शिंदे आणि राजेंद्र यशवंत भिलारे यांनी संगनमत करून वाद घातला. या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत होऊन त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीवरून खेड पोलिसांनी भादंवि कलम ३३२, ३५२, ३५३, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. बचाव पक्षाने सरकारी साक्षीदारांचा सखोल उलटतपास घेतला असता, साक्षीदारांच्या जबाबातील तफावत आणि घटनाक्रमाबाबत असलेली संदिग्धता न्यायालयासमोर स्पष्ट झाली. तपासातील त्रुटी आणि पुराव्यांचा अभाव यामुळे आरोपींवरील कलम ३५३ सारखे गंभीर आरोप टिकू शकले नाहीत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे तपासून न्यायालयाने नमूद केले की, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याचे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे सरकारी बाजू मांडू शकलेली नाही. परिणामी, न्यायालयाने सुनील कुमार शिंदे आणि राजेंद्र भिलारे यांची सर्व आरोपांतून सन्मानपूर्वक मुक्तता केली.

Total Visitor Counter

3284459
Share This Article