GRAMIN SEARCH BANNER

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची धडक कारवाई;बहादूरशेख नाका ते चिंचनाका रस्त्याची मोजणी व मार्किंग सुरू

Gramin Varta
113 Views

चिपळूण : चिपळूण नगर पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारताच धडाकेबाज पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी नगर पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी फौज घेऊन नगराध्यक्ष सकपाळ स्वतः रस्त्यावर उतरले आणि बहादूरशेख नाका ते चिंचनाका या महत्त्वाच्या रस्त्याच्या मोजणी व मार्किंगचे काम प्रत्यक्ष पाहणी करून सुरू केले.

या रस्त्याच्या विकासासाठी शासनाकडे १०४ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यापूर्वी रस्त्याची नेमकी लांबी व रुंदी निश्चित करण्यासाठी ही मोजणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी कावीळतळीपर्यंत मोजणी करण्यात आली असून, शुक्रवारी दुपारी २.३० वाजता कावीळतळी ते चिंचनाका या उर्वरित टप्प्याची मोजणी करून काम पूर्ण केले जाणार आहे.

नोंदणीकृत रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाची अचूक मोजणी व मार्किंग करण्यात येत असून, कागदोपत्री रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना नोटिसा देऊन अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर नगर पालिकेकडून धडक कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्पष्ट केले.

तसेच बहादूरशेख नाका ते चिंचनाका या मार्गावर दीर्घकाळापासून उभ्या असलेल्या बंद वाहनांबाबत यापूर्वीच नगर परिषदेने नोटिसा दिल्या आहेत. येत्या दोन दिवसांत ही सर्व बंद वाहने क्रेनच्या साह्याने उचलण्यात येणार असून, बेकायदेशीररीत्या रस्त्यावर वाहने उभी केल्याबद्दल संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कारवाई मोहिमेत उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर यांच्यासह मालमत्ता, वाहन आदी सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेवक गणेश आग्रे, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण हेही उपस्थित होते.

बहादूरशेख नाका ते चिंचनाका हा रस्ता पूर्वी महामार्ग विभागाकडे होता. अलीकडेच हा रस्ता नगर पालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, रस्त्याचे रुंदीकरण होऊन वाहतुकीची कोंडी सुटावी, या उद्देशाने नगराध्यक्षांनी उचललेले हे पाऊल नागरिकांना भावले आहे. स्वतः नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवत असल्याने त्यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3378458
Share This Article