GRAMIN SEARCH BANNER

अलिबाग समुद्रकिनारी महिलेचा गूढ मृत्यू; चिठ्ठीतून आत्महत्येचा संकेत

अलिबाग: येथील समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळी एका अंदाजे चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेच्या पर्समध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यातील मजकुरावरून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे येथील जीवरक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेच्या शेजारी तिची पर्स सापडली, मात्र त्यात तिची ओळख पटवणारा आधारकार्ड किंवा इतर कोणताही अधिकृत पुरावा मिळून आला नाही. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने संबंधित महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांनी महिलेच्या पर्सची सखोल झडती घेतली असता, त्यामध्ये एक चिठ्ठी हस्तगत करण्यात आली आहे. या चिठ्ठीत ‘मी आत्महत्या करत आहे’ असे नमूद असून खाली ‘पी. जी. पाटील’ अशी स्वाक्षरी करण्यात आली आहे. या चिठ्ठीमुळे प्रकरणाला वळण मिळाले असून, आत्महत्येचे नेमके कारण आणि संबंधित महिला नेमकी कुठली होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मृत महिलेचे वय साधारण ४० वर्षे, उंची साडेपाच फूट, शरीरयष्टी सडपातळ आणि वर्ण निमगोरा आहे. सध्या तरी या महिलेची ओळख पटलेली नसून, अशा वर्णनाची महिला बेपत्ता असल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485115
Share This Article