संगमेश्वर (दिनेश आंब्रे): संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, झोन क्र. ४० चिपळूण शाखा संगमेश्वरच्या वतीने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत धामणी येथे ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन” हे विशेष अभियान अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या अभियानांतर्गत धामणी येथील ‘असावी’ नदीवर “पाणी अडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून भव्य वनराई बंधारा बांधण्यात आला असून, यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या बंधाऱ्याचा थेट फायदा गुरववाडी आणि पवारवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरींना होणार असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
या सेवाकार्यादरम्यान मिशनच्या स्वयंसेवकांनी केवळ बंधाराच बांधला नाही, तर परिसरातील सार्वजनिक विहीर आणि पंप हाऊसची देखील स्वच्छता केली. या उपक्रमासाठी संगमेश्वर शाखेचे मुखी नारायण पवार, महिला सेवादल इन्चार्ज अंजली पकडे यांच्यासह सुमारे १०० हून अधिक महात्मा आणि सेवादल भगिनींनी श्रमदान केले. या सामाजिक उपक्रमाला धामणी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यात्मासोबतच समाजसेवेचा वसा जपणाऱ्या निरंकारी मिशनच्या या कार्याचे धामणी पंचक्रोशीतून भरभरून कौतुक होत आहे.





