संगमेश्वर: पाण्याच्या वादातून येडगेवाडीत राडा; लाकडी काठीने मारहाण करत वृद्धाला जीवे मारण्याची धमकी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर: पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तोडल्याच्या जुन्या वादातून संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात पाच जणांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील वातावरण तापले आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, येडगेवाडी येथील फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५) आणि आरोपी हे एकाच वाडीत राहणारे आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तोडल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी शंकर येडगे यांना गाठले. यावेळी झालेल्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी सुरेश बाबू येडगे आणि पांडुरंग बाबू येडगे यांनी फिर्यादीला लाकडी काठीने मानेवर व पाठीत बेदम मारहाण केली. मारहाण करताना ‘याला मारून टाका’ असे ओरडत इतर आरोपी सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे आणि अन्य दोन ते तीन साथीदारांनी शंकर येडगे यांना लाथाबुक्क्यांनी व हाताच्या थापटांनी मारहाण करून दुखापत केली.

या गंभीर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी शंकर येडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१) आणि इतर कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२६ नुसार दाखल केला आहे. आरोपींनी मारहाण करण्यासोबतच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *