GRAMIN SEARCH BANNER

साखरपा आरोग्य केंद्रात मृत्यू झालेल्या तरुणाच्या हत्येचा पर्दाफाश

मित्रांमध्ये दारूवरून झालेल्या भांडणातून हाणामारीत एकाचा मृत्यू, आरोपीला अटक; देवरुख पोलिसांची जलद कारवाई

देवरुख: रत्नागिरीतील निसर्गरम्य आरेवारे परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोन मित्रांमधील किरकोळ वादाने अत्यंत भीषण वळण घेतले असून, यात सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साळकडे, ता. पाटण) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) या संशयित आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष आणि सुधीर हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक होते, मात्र ३१ मार्चच्या रात्री दारू पिण्यावरून झालेला एक छोटासा वाद सुधीरच्या जीवावर बेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत फिरून झाल्यानंतर हे दोघेही आरेवारे भागात एकत्र जेवण आणि मद्यप्राशन करण्यासाठी थांबले होते. रात्री ११:३० च्या सुमारास तेथून निघाल्यावर गाडीमध्ये पुन्हा दारूवरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका विकोपाला गेला की आशिष भावके याने सुधीरला गाडीतच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सुधीरला अंतर्गत आणि गंभीर दुखापत झाली, तर सुधीरला जखमी अवस्थेत सोडून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सुधीरची प्रकृती खालावल्याने त्याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर देवरुख पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत आशिष भावकेला ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर बी.एन.एस. २०२३ च्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3471960
Share This Article