रत्नागिरी:मिरकरवाडा जेटी परिसरात एका ५६ वर्षीय नेपाळी मच्छीमार खलाशाचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घनबहादुर गड्डुराम थारू (वय ५६, मूळ रा. कैलाली, नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव असून, ते येथील मिरकरवाडा जेटीवर मजर उम्मर मुकादम यांच्या नौकेवर कामाला होते. दोन दिवस रात्रंदिवस समुद्रात मासेमारीचे काम करून थकलेले घनबहादुर बोटीवरच झोपले होते, मात्र सकाळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. ही घटना २२ मार्च रोजी सकाळी मिरकरवाडा ब्रेकवॉटर परिसरात बोटीवरच उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, घनबहादुर हे २० मार्च रोजी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. दोन दिवस सतत काम केल्यानंतर २२ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची बोट मासे घेऊन मिरकरवाडा येथे परतली. रात्रभर काम केल्यामुळे थकलेले घनबहादुर बोटीवरच एका कोपऱ्यात झोपी गेले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास बोटीवरील मासे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा त्यांना उठवण्यासाठी गेलेल्या इतर खलाशांना घनबहादुर यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. ते बेशुद्ध असल्याचे पाहून त्यांचे जावई तुलसिराम डंगो यांनी तातडीने बोट मालकांना कल्पना दिली आणि रुग्णवाहिका बोलावून त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवस सततचे काम आणि थकव्यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, परप्रांतीय मच्छीमार कामगारांमध्ये या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.





