रत्नागिरी :तालुक्यातील वडद येथे अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात रात्री घरामध्ये शिरलेल्या बिबट्याला माणसांची चाहूल ऐकताच स्लायडिंगची काच फोडून बाहेर पडून पसार झाला. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सविस्तर वृत्त असे की, घरात कोणीच सोबतीला नसल्याने बिबट्याच्या भीतीने पूजा शिंदे या रात्री जेवण आटोपल्यानंतर शेजारील घरात झोपायला गेल्या होत्या. रात्री दोन वाजता बिबट्या शिरला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घराच्या मागील बाजूला असलेल्या पडवीवर कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. या आवाजाने शेजारील मंडळी जागी झाली. घरात चोरटा तर शिरला नाही ना अशी शंका आली. म्हणून पूजा शिंदे यांनी सावधपणे घराचे कुलूप उघडले. हळूवार दरवाजा उघडत असतानाच हॉलमधील खिडकीची काच फोडून खिडकीतून बिबट्या धूम ठोकून पळाला. या अचानक घडलेल्या घटनेने पूजा शिंदे पुरत्या घाबरल्या.
गेले १५ दिवस या गावात सायंकाळी बिबट्या फिरताना दिसत आहे. याची माहिती सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील यांनी वन विभागाला कळवली आहे. २० जूनला रात्री बिबट्या वडदचे ग्रामदैवत व्याघ्रांबरी मंदिर परिसरात फिरत होता. या मंदिराशेजारीच गणपतवाडी आहे. तेथे पूजा चंद्रकांत शिंदे राहतात.
शनिवारी (ता. २१) सकाळी सरपंच कोमल मुरमुरे, उपसरपंच संदीप धनावडे, पोलिसपाटील चारुता सोमण, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र करजकर, ग्रामस्था भिकाजी काजारे यांनी चंद्रकांत शिंदे यांच्या घराची पाहणी केली.
त्यावेळी घरामागील पडवीवरून उडी टाकून तेथील अर्धवट उघड्या खिडकीतून बिबट्या आत आल्याचे लक्षात आले. घरातील जमिनीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे दिसत होते. अचानक घराचा दरवाजा उघडण्याच्या आवाजाने बिबट्या सावध झाला. त्याने बंद खिडकीवर उडी मारली. त्यामुळे खिडकीची काच फुटली. त्यातून बिबट्या बाहेर पडून जंगलात पसारा झाला. त्यावेळी फुटलेल्या काचांना आणि खिडकीजवळ बिबट्याची भिस (केस) चिकटलेले आढळून आले आहेत.