GRAMIN SEARCH BANNER

देवरुख नगरपंचायत निवडणूक: गाव विकास समिती आणि ‘आप’ यांची अखेर युती

Gramin Varta
205 Views

‘पारदर्शक कारभार आणि विकासाची गॅरेंटी’ देत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब

देवरुख:देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे.अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ (आप) यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केली आहे. गाव विकास समितीच्या वतीने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली जाणार हे याआधीच जाहीर करण्यात आले होते.’पारदर्शक कारभार आणि विकासाची गॅरेंटी’ या मुद्द्यांवर आणि किमान समान कार्यक्रमावर ही युती आधारित असल्याचे उदय गोताड यांनी स्पष्ट केले.

या युतीपूर्वी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र पार पडले. यामध्ये गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, राहुल यादव,संगमेश्वर तालुका प्रभारी नितीन गोताड तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव आणि तालुका अध्यक्ष सचिन आपिष्टे यांचा समावेश होता. सलग झालेल्या बैठकीनंतर सोमवारी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे ,आपचे जिल्हा अध्यक्ष डॉ रविंद्र जाधव यांनी या युतीवर अंतिम शिक्कामोर्तब केले.

आगामी निवडणूक ही पूर्णपणे मुद्द्यांवर आधारित लढवली जाणार असल्याचे दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर गाव विकास समितीचे नेतृत्व डॉ. मंगेश कांगणे करणार आहेत, तर आम आदमी पार्टीचे नेतृत्व तालुका अध्यक्ष सचिन आपिष्टे करतील. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि ‘आप’चे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल.

या युतीबाबत बोलताना उदय गोताड म्हणाले, “ही युती पारदर्शक कारभार आणि विकासाची गॅरेंटी हा विचार घेऊन, किमान समान कार्यक्रमावर झाली आहे.” विशेष म्हणजे, गाव विकास समितीचे ‘झिरो बजेट इलेक्शन’ हे धोरण या निवडणुकीत पूर्णपणे राबविले जाणार आहे. शहराचा विकास करण्यासाठी देवरुखच्या जनतेला गाव विकास समिती व ‘आप’च्या रूपाने एक उत्तम पर्याय मिळेल, असा विश्वास दोन्ही संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3198842
Share This Article