माहितीच्या आधिकारात माहिती न दिल्यामुळे वर्षभरातील तिसरे उपोषण
संगमेश्वर : माहिती अधिकारांतर्गत वेळेत माहिती न दिल्यामुळे ग्रामसेवक अशोक भुते तसेच विस्तार अधिकारी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार अर्जदार सुभाष लांजेकर (फुणगुस, ता. संगमेश्वर) यांनी केली आहे. ग्रामसेवकावर कारवाई न केल्यास 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार असल्याचे लांजेकर यांनी म्हटले आहे. माहितीच्या आधिकारात माहिती न दिल्यामुळे वर्षभरात या ग्रामसेवकाच्या विरोधात तिसरे उपोषण आहे. यापूर्वी राजेंद्र बापूराव देसाई व प्रीतम दिपक भोसले यांनी उपोषण केले होते.
सदर प्रकरणात सुभाष लांजेकर यांनी 17/01/2025 रोजी ग्रामसेवक यांच्याकडे माहितीच्या मागणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ठरलेल्या मुदतीत माहिती न दिल्याने दिनांक 24/02/2025 रोजी विस्तार अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करण्यात आला. तरीही कोणतीही माहिती पुरवली गेली नाही.
त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकार कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 आणि 1964 च्या अधिनियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका लांजेकर यांनी लावला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील माहिती मागितली होती.
या संदर्भात लांजेकर यांनी जिल्हाधिकारी यांस पत्र व्यवहार केला आहे. दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दाखल केली असून, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या माहितीच्या हक्काला वारंवार दुजोरा न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे
फुणगुस गावातील कामांची माहिती न दिल्याबद्दल ग्रामसेवकाविरोधात तक्रार; कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला उपोषण
