नागपूर: राऊळगाव स्फोट प्रकरणात स्फोटप्रकरणी 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; 11 जणांना अटक

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या स्फोटक निर्मिती कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कंपनीचे मालक संजय चौधरी, आलोक चौधरी यांच्यासह एकूण 21 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.कंपनीच्या उपाध्यक्षासह 11 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये 2 संचालकांचाही समावेश आहे.रविवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास कंपनीतील ‘नोनल क्रिम्पिंग युनिट’मध्ये झालेल्या स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र रोष निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार कळमेश्वर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या तक्रारीवरून 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये उपाध्यक्ष चंद्रशेखर ब्रिजमोहन रजवाड (58), वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप हिंमतलाल सोलंकी (62), महाव्यवस्थापक प्रदीप रघुनाथ शर्मा (57), प्रोडक्शन व्यवस्थापक रोशन भास्करराव राऊत (43), प्रोडक्शन व्यवस्थापक नीलकमल ठाणीराम डोंगरे (48), प्रोडक्शन सुपरवायझर पंकज रामनरेश पांडे (32), लोडिंग सुपरवायझर सुधाकर रमेश उपरकर (43) आणि बिल्डिंगची जबाबदारी असलेले विलास अंकुश माळवे (35) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याशिवाय कंपनीचे संचालक रवि प्रकाशचंद्र कामरा ( रायपूर, छत्तीसगड) आणि राकेश सुदर्शन तिवारी यांनाही अटक करण्यात आलीय. सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 105 (सदोष मनुष्यवध), 125-अ (इतरांचे जिवीत किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) आणि 288 (स्फोटक पदार्थांबाबत निष्काळजीपणाचे वर्तन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *