GRAMIN SEARCH BANNER

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करून दादरपर्यंत चालवा; खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Gramin Varta
153 Views

नवी दिल्ली : कोकणातील चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेचे मूळ स्थानक बदलल्यामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल थांबवण्यासाठी ही गाडी पुनश्च दादर स्थानकातून सुरू करावी, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शक्य असल्यास ही गाडी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत (सीएसएमटी) विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी ही पॅसेंजर रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादरपर्यंत धावत होती, मात्र कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत या गाडीची मर्यादा केवळ दिवा स्थानकापर्यंतच सीमित केली.

यामुळे मुंबईतील कामावरून सुटून थेट गावी जाणाऱ्या प्रवाशांना आता अतिरिक्त लोकल प्रवास करावा लागत असून वेळ, पैसा आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी रात्रीच्या वेळी दिवा गाठणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची सध्याची दुरवस्था पाहता, कोकणवासीयांसाठी ही पॅसेंजर रेल्वे अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय ठरली होती. मात्र, दिवा स्थानकापर्यंत ही सेवा मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरुद्ध मोठी नाराजी पसरली आहे. खासदार वायकर यांनी यापूर्वी १० जानेवारी २०२५ रोजीदेखील या संदर्भात रेल्वे मंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवले होते, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमधील रोष वाढत असून, हा प्रश्न केवळ रेल्वेचा नसून कोकणच्या जनतेच्या भावनांशी निगडित असल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दादर-रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ पूर्ववत दादरपर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत आणि मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट प्रवासाची सोय व्हावी यासाठी ही गाडी सीएसएमटीपर्यंत वाढवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे

Total Visitor Counter

3391780
Share This Article