GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, दोघे जखमी

Gramin Varta
16 Views

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी सतीचाकोंड परिसरात एका भरधाव कारने उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सुरुची हॉटेलजवळ झालेल्या या अपघातात रिक्षातील दोघे जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी खेड पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षा चालक अनंत महादेव दळवी (वय ५६, रा. खवटी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एम.एच. १२ एम.डब्लू. ९८०७) घेऊन कामगार हिराचंद्र लक्ष्मण धोतरे यांच्यासह सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात होते. खवटी येथील सुरुची हॉटेलजवळ त्यांनी आपली रिक्षा रस्त्याच्या डाव्या कडेला उभी केली होती आणि ते फोनवर बोलत होते. त्याच वेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने (क्र. एम. एच. ०५ जी.ए. ००७४) उभी असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात रिक्षा चालक अनंत दळवी यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, सोबत असलेले हिराचंद्र लक्ष्मण धोतरे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक नवप्रीतसिंग सुरेंदरसिंग वासन (वय २६, रा. डोंबिवली, ठाणे) याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक देऊन निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3377539
Share This Article