GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी तहसिल कार्यालयातर्फे संविधान हत्या दिवस; आणीबाणी कालावधीत कारावास भोगलेल्यांना सन्मानपत्र

रत्नागिरी: 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाही करिता लढा देताना मिसा व डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा रत्नागिरी तहसिल कार्यालयातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी संविधान हत्या दिनानिमित्त पोस्टर्स प्रदर्शनही करण्यात आले.

तहसिलदार कार्यालय तथा कार्यकारी दंडाधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने आज करण्यात आलेल्या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977, 21 महिन्यांच्या या कालावधीत घटनेमधील तरतुदींचा आधार घेऊन आणीबाणी लागू करण्यात आली होती. यावेळी विरोध करणाऱ्यांना तुरुंगवास सोसावा लागला. आपल्या देशाला संघर्ष करुन स्वातंत्र्य मिळाले आहे. आणीबाणीच्या काळात मिसा, डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी तुरुंगवास झाला, वेदना झाल्या, अशा लढवय्यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे.
प्रांताधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सन्मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी उपस्थित बलवंत मधुसुदन वेलणकर, शिवराम बाळकृष्ण ठिक, सुभाष श्रीधर राणे, प्रदीप चंद्रकांत परुळेकर, यशवंत रत्नू पाले, वैदेही श्रीराम रायकर, विवेक जगन्नाथ भावे, संजय शांताराम केतकर, सुहासिनी मधुकर रसाळ, महेंद्र रामकृष्ण सुर्वे, सुनंदा पुरूषोत्तम बेर्डे यांना यावेळी सन्मानपत्र देण्यात आले. श्री. परुळेकर व श्रीमती रायकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करुन आणीबाणीतील आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसिलदार श्री. म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474914
Share This Article