रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलातील १५ पोलीस अंमलदारांना नुकतीच वरिष्ठ पदावर पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते या सर्व अंमलदारांना पदोन्नतीचे स्टार आणि फिती लावून गौरविण्यात आले. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कर्तव्यपूर्ण प्रवासासाठी व सेवाकार्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.
पोलीस दलातील या अंतर्गत पदोन्नतीमध्ये एकूण ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर बढती मिळाली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अंमलदारांमध्ये स्नेहल पेढांमकर, विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे आणि स्वप्नील तळेकर यांचा समावेश आहे. तसेच दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी आणि राजेंद्र नलावडे या अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा आणि वरिष्ठ पदाची वाढलेली जबाबदारी यामुळे पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, इतर अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच पदोन्नती प्राप्त सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






