राजापूर: राजापूर शहरासह रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या सौ. जान्हवी प्रफुल्ल दिवटे यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी अथक, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रथम श्रेणीसह विधी क्षेत्रातील (B.Sc. LLB) पदवी संपादन करून दिवटे घराण्यातून वकील होण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले आहे.
मुळातच हुशार असलेल्या जान्हवी दिवटे यांना कायदेविषयक बाबींमध्ये विशेष रुची होती. संसाराचा गाडा समर्थपणे हाकत असतानाच त्यांनी आपल्या मनात एक निश्चय केला होता की, एक दिवस आपण विधी क्षेत्रात पदवी प्राप्त करू. हाच ध्यास घेऊन त्यांनी विधी क्षेत्रात प्रवेश घेण्याची तयारी केली. त्यांच्या या प्रवासात पती प्रफुल्ल दिवटे यांची त्यांना मोलाची साथ लाभली. याच साथीच्या बळावर त्यांनी B.Sc. LLB पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला.
दिवटे घराण्यातून वकील होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. जान्हवी दिवटे यांनी हा मान मिळवल्यामुळे राजापूर शहरात आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशाने अनेक महिलांना प्रेरणा मिळाली असून, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे.