GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: गोळवलीच्या नमनाचा आज दुबईत प्रयोग

संगमेश्वर : कोकणातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नमन ही लोककला गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील जनतेचे मनोरंजन करत आहे. रोजगारासाठी कोकणातून मुंबईकडे गेलेल्या कोकणी समाजासोबत हे नमन मुंबईपर्यंत पोहोचले. आता शिवभक्त कोकण लोकनाट्य नमनाच्या माध्यमातून ही लोककला सातासमुद्रापार झेप घेत थेट दुबईत सादर होणार आहे. सुमारे दोन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक नमनचा कार्यक्रम आज रंगणार आहे.

महाराष्ट्रातून, विशेषतः कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्रेक्षक या कार्यक्रमास लाभणार असून, दुबईतील मराठी व्यापारी, महाराष्ट्र मंडळ आणि कोकणी जनता या कार्यक्रमाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या विशेष प्रयत्नांतून, तरुण कलाकार निलेश किंजळकर यांच्या माध्यमातून आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून हे नमन इतिहासात प्रथमच परदेशात सादर केले जाणार आहे.

या नमन कार्यक्रमातून कोकणातील लोककला, गण, गौळण, ‘मुक्काम पोस्ट कोकण’सारखी सादरीकरणे आणि कोकणाची खास वैशिष्ट्ये दुबईतील प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोकणच्या मातीतील लोककलेचा हा जागतिक प्रवास कोकणी संस्कृतीसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

Total Visitor Counter

3487277
Share This Article