संगमेश्वर: साहित्य विश्वातील तेजस्विनी व्यक्तिमत्त्व सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मराठी विकास संस्था आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित ‘काव्य अभिवाचन’ स्पर्धेत परचुरी गावाची कन्या कुमारी सेजल मेस्त्री हिने महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे. ही स्पर्धा नुकतीच ७ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल येथे संपन्न झाली.
काव्य अभिवाचनासाठी सेजल भार्गव मेस्त्री हिने कविवर्य बा. भ. बोरकर यांची ‘तापल्या आहेत तारा’ आणि कवी अभी मुंडे यांची ‘यंदा घरी ये इठ्ठला’ या दोन कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. तिच्या सादरीकरणाचा मापदंड इतका उत्कृष्ट होता की तिला महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक मिळाले.
सेजल ही ग्रामीण भागातील उगवता तारा असून, तिची जडणघडण आई वैभवी भार्गव मेस्त्री आणि वडील भार्गव मेस्त्री यांच्या सुसंस्कारातून झाली आहे. नवोदित कवयित्री आणि उत्कृष्ट लघु कलाकार असलेली सेजल आतून रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मानस जपत आहे. सेजलच्या यशाची वाटचाल इयत्ता दुसरीपासून वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, निबंध आणि त्यानंतर स्वतः कविता तयार करण्याच्या माध्यमातून सुरू झाली. या प्रवासात तिची आई, वडील आणि तिला उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच साहित्यातील मार्गदर्शक यांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. सेजलच्या या दैदीप्यमान यशाबद्दल परचुरी ग्रामस्थ, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि रत्नागिरी जिल्हा परिसरातील हितचिंतकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







