GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार शेतकऱ्यांना साडेतीन कोटींची नुकसान भरपाई

Gramin Varta
65 Views

रत्नागिरी: ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ८११ भात उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे.
.एकूण ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयांच्या निधीचे वाटप पूर्ण झाले आहे.

यंदा सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात भात व नाचणीची पिके जोमात होती. मात्र कापणीच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाले, तर काही ठिकाणी भाताला मोड फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करत ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असला, तरी खेड, संगमेश्वर, चिपळूण, दापोली आणि लांजा तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद झाली. गुहागर आणि राजापूर तालुक्यांमध्ये तुलनेने कमी नुकसान झाले होते.

जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून मंजूर झालेला निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला या मदतीमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील भातपिकाच्या नुकसानीसाठी पाठवलेला प्रस्ताव मंजूर होऊन ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये थेट २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

Total Visitor Counter

3199329
Share This Article