शासनाच्या योजनांचा, सुविधांचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील
रत्नागिरी : समाजातील तळागळातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत सामाजिक न्याय पोहचला पाहिजे. त्याची उन्नती व्हावी, यासाठी शासन विविध योजना, सुविधा देत आसते. मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा साक्षरता शिबीराच्या माध्यमातून करण्यात येत असते लाभार्थ्यांनी या योजनांचा, सुविधांचा फायदा घ्यावा आणि इतरांनाही घेण्यासाठी याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव समुह ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्र. सरपंच श्रध्दा शेट्ये, ग्रामविकास अधिकारी प्रविण माईन उपस्थित होते.
‘सार्वजनिक सेवा व केंद्र, राज्य सरकारच्या योजना आणि नैसर्गिक, मानव निर्मिती आपत्तीमुळे पीडित लोकांना विधी सेवा’ या विषयावर मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील म्हणाले, लोकांचं कल्याण व्हावं. लोकांचं जीवनमान सुधारावे, त्यासाठी विविध योजना शासनामार्फत केल्या जात असतात. त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सर्व योजना आणि त्याचा लाभ उपेक्षित व्यक्तीला मिळावा, हा या शिबीराचा प्रमुख उद्देश आहे. प्राधिकरणामार्फत जनजागृती करणे, कायदे पोहोचवणे, कायद्याच्या तरतुदी पोहचविणे, प्रत्येकाला न्याय मिळावा आणि सामाजिक न्याय साधण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात. योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यामध्ये काही जर अडचणी येत असतील, तर त्या अडचणी दूर करत असतो.
भारतात अनेक कायदे आहेत आणि हे कायदे आपल्या सर्वांनी पाळणं हे आपल्यावर बंधनकारक आहे. गैरवर्तन केलं गेलं, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. गरजू आणि उपेक्षित लोकांना तुमची केस लढण्यासाठी मोफत वकील दिला जातो आणि तो जिल्हा विधी सेवा प्राधिकरण देत असतो. त्याचबरोबर जिल्हा न्यायालयातदेखील तुमची जर केस लढवायची असेल, तर जिल्हा न्यायालयातदेखील तुम्हाला मोफत वकील दिला जातो. उच्च न्यायालयामध्ये पण, तुम्हाला जायचं असेल, तर तिथे देखील मोफत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल करायची असेल, तरी देखील तुम्हाला मोफत वकील दिला जातो.
महिलांना त्याचबरोबर अपंग व्यक्ती असेल, लहान मुलांना किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशा मुलाला देखील वकील मिळतो. जो व्यक्ती तुरुंगात आहे, मुलं लहान असतील तर त्याला जामिन मिळण्यासाठी कोण प्रयत्न करणार, त्याची केस चालवण्यासाठी कोण प्रयत्न करणार तर अशा तुरुंगातल्या आरोपीला देखील मोफत वकील मिळतो. सरकारने निर्माण करून दिलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.
मनोधैर्य योजनेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रत्नागिरी तालुक्यातील 125 मुलांना आधार कार्ड प्राधिकरणामार्फत मिळवून दिले आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी निष्क्रीयपणा बेफीकरपणा लाभार्थ्यानी आवर्जुन जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी श्री. माईंन यांनी आभार मानले. शिबीराला अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, ग्रामस्थ उपस्थित होते.