देवरुख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गाडीचालकाला मारहाण झाल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.५० वाजता ताम्हाणे फाट्याजवळील एका हार्डवेअर दुकानासमोर घडली.
तेजस विजय मोहिते (वय २५, रा. देवरुख, सह्याद्रीनगर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोहिते हे त्यांच्या टाटा टियागो गाडीने देवरुख ते आंबवली प्रवास करत असताना, त्यांच्या गाडीसमोरील रिक्षा अचानक थांबल्याने त्यांनी रिक्षाला ओव्हरटेक केले. याचवेळी समोरून ताम्हाणे ते कोसुंब अशी येणारी इको गाडीमधील आरोपी सूरज कृष्णा जाधव (रा. कोसुंब फुगीचीवाडी) आणि त्याच्यासोबतच्या एका अनोळखी व्यक्तीला याचा राग आला.
आरोपींनी दारूच्या नशेत तेजस मोहिते यांना शिवीगाळ करत गाडीतून बाहेर ओढले आणि रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तेजस मोहिते यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, कंबर, पोट आणि डोक्यावरही मार लागला आहे. देवरुख पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११७(२), ३५२, ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.