GRAMIN SEARCH BANNER

अवैध मासेमारी करणारी गोव्याची नौका कस्टमकडून जप्त; पाच खलाशी ताब्यात

Gramin Varta
196 Views

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदर परिसरात अवैध मासेमारी करणारी गोवा राज्यातील एक मासेमारी नौका सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केली आहे. या नौकेतून सुमारे ५० किलो मासळी आढळून आली असून पाच खलाशांना कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. संबंधित नौकेकडे मासेमारीसाठी वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीमा शुल्क विभागाकडून सागरी गस्त आणि काटेकोर देखरेख सुरू आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी रेड्डी बंदरात संशयास्पदरीत्या मासेमारी करणारी एक नौका कस्टम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. सदर नौकेची तपासणी केली असता ती गोवा राज्यात नोंदणीकृत असल्याचे आढळून आले. या नौकेचा क्रमांक IND-GA-01-MM-550 असा असून तिच्याकडे मासेमारीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान नौकेत ५० किलो मासळी आणि पाच खलाशी आढळून आले. हे प्रकरण मत्स्यव्यवसायाशी संबंधित असल्याने जप्त केलेली नौका पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टम विभागाचे अधिकारी पवन राठी यांनी दिली.

Total Visitor Counter

3379401
Share This Article