GRAMIN SEARCH BANNER

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी साधला मालगुंड प्रशालेतील विद्यार्थ्यांशी संवाद

Gramin Varta
67 Views

तरवळ/अमित जाधव: मराठी साहित्य क्षेत्रातील थोर कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत केली हितगूज.

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे दिनांक २४ मार्च रोजी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या मनावर साने गुरुजी यांच्या शामची आई या पुस्तकाचा मोठा प्रभाव पडला होता हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.

शालेय जीवनात एक सर्वसामान्य विद्यार्थी असल्यामुळे मी फार काही करू शकलो नाही. पण मी साहित्य क्षेत्राकडे वळलो, आणि या मराठी साहित्याने मला भरभरून दिलं. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीला कवीची नजर असली पाहिजे.कवीची नजर तीक्ष्ण असली पाहिजे, असं म्हणतात  “जे न देखे रवी ते देखे कवी ” कवी आपल्या अंतरचक्षूच्या माध्यमातून संवाद साधतात. दृष्टी आणि नजर यातला फरक विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे.

सध्या आपण यांत्रिक बुद्धिमत्तेच्या जगात वावरतो आहोत, यंत्र आपल्याशी संवाद साधू शकत नाही त्यासाठी मनुष्यच आवश्यक आहे. यंत्र मनुष्याला कधीही पर्याय असू शकत नाहीत. पुढे बोलताना ते असे म्हणाले माणसाच्या शरीराला मळ लागला तर तो आपण कपड्याने स्वच्छ करू शकतो, पण माणसाच्या मनाला मळ लागला तर तो कशानेही पुसता  येणार नाही. त्यामुळे मनाला कधीही मळ लागू देऊ नका, मन नेहमी स्वच्छ ठेवा. आणि मन स्वच्छ ठेवायचे असेल तर शाळेत जा, चांगल शिक्षण घ्या, चांगले विचार आत्मसात करा. असे अनेक प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडत असताना आपले भाग्य थोर आहे की आपण सर्वजण कवी केशवसुत यांच्या भूमीत जन्माला आलो आहे. हे ही उपस्थित विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे वय वर्षे ९६ आहे या वयात सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या वाणीत उत्साह दिसून येत होता. एखाद्या चिरतरुण साहित्यिका प्रमाणे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

या विशेष संवाद पर कार्यक्रमात उपस्थित राहिल्या बद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांनी केला. या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे सदस्य व कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड चे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ चे उपाध्यक्ष तसेच को.म.सा.प चे उपाध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉ प्रदीप ढवळ, को.म.सा.प च्या सचिव दीपा ठाणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेतील शिक्षक अमित जाधव यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3375085
Share This Article