GRAMIN SEARCH BANNER

सायकलिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोलीतील खेळाडू सरस

Gramin Varta
67 Views

रत्नागिरी: जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात झाल्या. स्पर्धेत रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोलीतील खेळाडू सरस ठरले.

राज्याचे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

१४ वर्षांखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये रत्नागिरीच्या रुद्र जाधव याने प्रथम, तर चिपळूणच्या मिथिल टाकळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये दापोलीच्या वरद कदमने प्रथम, चिपळूणच्या ईशान वझे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षांखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलींमध्ये रत्नागिरीच्या शमिका खानविलकरने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मास स्टार्ट प्रकारात आणि १४ वर्षांखालील मास स्टार्ट प्रकारात खेड येथील अनुक्रमे पीयूष पवार आणि दिशान्त पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वडील दीपक यशवंत पवार आणि खेड सायकलिंग क्लबचे मार्गदर्शन पीयूष आणि दिशान्त पवार यांना लाभले. रुद्र जाधव आणि शमिका खानविलकर यांना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे फाउंडर मेंबर असलेल्या दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. कोकणात सायकलिंगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीनिवास आणि धनश्री गोखले यांचे मोलाचे मार्गदर्शन ईशान वझेला मिळाले.

चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, देवरूख येथे गेल्या काही वर्षांत सायकलिंग क्लब स्थापन झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सायकलिंग वृद्धिंगत झाले आहे. खेड सायकलिंग क्लब हा जिल्ह्यातील सर्वांत जुना क्लब आहे. दापोली सायकलिंग क्लबची दापोली सायक्लोथॉन, चिपळूण सायकलिंग क्लबची किंग ऑफ कुंभार्ली, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रोलर कोस्टर सायक्लोथॉन या सायकल स्पर्धा सर्वदूर पोहोचल्या आहेत. दापोलीमधील अंबरीश गुरव, तसेच मिलिंद खानविलकर, चिपळूण येथील आलेकर बंधू, खेड येथील विनायक वैद्य, तसेच चिपळूण येथील श्रीनिवास व धनश्री गोखले यांचा नवीन सायकलिस्ट घडविण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. चिपळूण सायकलिंग क्लबच्या डॉ. मनीषा वाघमारे यांनी सायकलिंगच्या माध्यमातून नुकतीच गिनीज बुकमध्ये गवसणी घातली आहे. तसेच चिपळूणचे सायकलसम्राट प्रशांत दाभोळकर यांनी चालू वर्षांत १० हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे.

गेली तीन वर्षे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून नियमित सायकल राइड चालू आहेत. तसेच सायकलविषयक अनेक उपक्रम चालू आहेत. यातून रुद्र आणि शमिकाला सायकलची गोडी निर्माण झाल्याचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांनी सांगितले. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मे महिन्यात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने शालेय विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी किड्स सायक्लोथॉनचे यशस्वीपणे आयोजन केले होते. यातून शालेय स्पर्धेसाठी खेळाडू तयार झाले, असे या वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सांगण्यात आले.

सायकलिंग स्पर्धेमध्ये खेळताना खेळाडूबरोबर चांगली सायकलदेखील तितकीच महत्त्वाची असते. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून समाजातील कुशल आणि पात्र सायकलिस्टना वापरता यावी म्हणून चांगली रेसर सायकल उपलब्ध करून दिली आणि ती देताना उदयोन्मुख खेळाडू ही सायकल वापरू दे, असे सांगितले. रुद्र दर्शन जाधव याने हीच रेसर सायकल आजच्या शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये वापरली आणि प्रथम क्रमांक मिळवला. उपस्थित सायकलप्रेमींनीसुद्धा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबविषयी विचारणा केल्याचे आणि कुतूहल व्यक्त केल्याचे दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांनी सांगितले. सर्व शालेय सायकलपटूंचे जिल्ह्यातील सायकलप्रेमींनी विशेष अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

2646717
Share This Article