GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात पोलीस असल्याची बतावणी करून ८० वर्षीय वृद्धाची सोनसाखळी लुटली

चिपळूण : पोलीस असल्याची बतावणी करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ८० वर्षीय वृद्धाची सुमारे ९८ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लुटल्याची घटना रविवारी सकाळी ११.३८ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यावर घडली. शांताराम दौलतराव साळवी (वय ८०, रा. संगमेश्वर) असे लुटीचा बळी ठरलेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शांताराम साळवी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३८ वाजता साळवी हे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील स्वागत हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात होते. त्याच वेळी दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आल्या. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून साळवी यांच्याकडील सोन्याची साखळी, घड्याळ व चाव्या तपासणीसाठी काढण्यास सांगितले.

चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साळवी यांनी खिशातील रुमाल काढून दिला. त्या रुमालात साखळी, घड्याळ व चाव्या ठेवत असल्याचा बनाव करून चोरट्यांनी तोच रुमाल परत दिला आणि दुचाकीवरून पसार झाले. काही वेळाने रुमाल तपासला असता त्यात घड्याळ व चाव्या होत्या; मात्र सोन्याची साखळी नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच साळवी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3485557
Share This Article