GRAMIN SEARCH BANNER

मालवणी रंगभूमीचे लाडके कलाकार गंगाराम गवाणकर यांच्या अस्थींचे ९ नोव्हेंबर रोजी माडबन समुद्रात विसर्जन

Gramin Varta
85 Views

जैतापूर/राजन लाड: मालवणी रंगभूमीला आपल्या लेखणीने आणि अभिनयाने नवा आयाम देणारे प्रख्यात नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते कै. गंगाराम गवाणकर यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या मूळगावी राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रात रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० नंतर करण्यात येणार आहे. गंगाराम गवाणकर यांचे मुंबई येथे उपचार सुरू असताना २७ ऑक्टोबर रोजी रात्री दुःखद निधन झाले होते. त्यांचे अंत्यसंस्कार मुंबईतच पार पडले. त्यानंतर, त्यांच्या अस्थिकलशाचे विधी त्यांच्या अत्यंत प्रिय असलेल्या माडबन येथे पार पडत आहेत. मालवणी नाट्यसृष्टीतील या महान कलाकाराच्या अस्थिकलशाचे दर्शन त्यांच्या चाहत्यांना, मित्रपरिवाराला आणि नाट्यप्रेमींना घेता यावे यासाठी त्यांच्या माडबन येथील राहत्या घरी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

यामुळे कोकणच्या मातीतील या लाडक्या कलाकाराला अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. त्यांचा अस्थिकलश ८ नोव्हेंबर रोजी माडबन येथे आणला जाणार असून, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी, समुद्रात विसर्जन विधी पार पडेल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

गंगाराम गवाणकर यांचे माडबन हेच कायमचे वास्तवस्थान होते. याच कोकणच्या भूमीतून त्यांनी ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’ यांसारखी गाजलेली नाटके रंगभूमीला दिली आणि मालवणी भाषेला मराठी नाट्यजगतात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या ‘व्हाया वस्त्रहरण’ या आत्मचरित्रातूनही त्यांचा नाट्यमय जीवनप्रवास वाचकांच्या भेटीला आला. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे, लोकांमध्ये सहज मिसळून जाणारे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कोकण आणि मराठी नाट्यजगत शोकसागरात बुडाले होते. आता अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आणि विसर्जन विधीला उपस्थित राहून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने या विधीला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366978
Share This Article