‘ईव्हीएम’द्वारे निवडणूक : लोकशाही शिकताना दिला मतदानाचा आदर्श; मुख्यमंत्रिपदी सगुण वासनिक, तृप्ती बोपचे
तिरोडा : प्रतिनिधी
दरवर्षी कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान होते. मात्र मतदान म्हणजे काय? याचे कुतुहल विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार येईपर्यंत कायम राहते. ‘मतदान हे लोकशाहीला बळकट बनवते’, ‘मतदान हा आपला अधिकार आहे’ हे धडे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना मिळतात. ‘मतदानाचा टक्का वाढला पाहिजे’ यासाठी शाळांचे विद्यार्थी जनजागृती फेरीही गावागावातून काढतात, पण मतदान म्हणजे नेमके काय, याचे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत नाही. पण मतदान केंद्रात जाऊन बटन दाबून मतदान करण्याची संधी जेव्हा विद्यार्थ्यांना मिळते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असतो. प्रत्यक्षात मतदान म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? राष्ट्रीय कर्तव्य कशी पार पाडायची? अशा अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना ‘ईव्हीएम’चा आवाज आल्यावर सहज समजू शकतात, याचा अनुभव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भजेपार येथील विद्यार्थ्यांनी घेतला. पुस्तकात वाचलेला प्रौढ मताधिकारही स्वतः कृतीतून अनुभवला. लोकशाही शिकताना विद्यार्थ्यांनी मतदानाचा आदर्श दिला. ईव्हीएम अँपचा वापर करून विद्यार्थ्यांनी मतदान केले आणि त्याद्वारे शाळेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय मंत्रिमंडळ निवडण्यात आले. मुख्याध्यापक रामेश्वर बावनकर, शिक्षक तानसेन जमईवार, श्रीकांत चौगुले, भाग्यश्री रेवडेकर यांनी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा ‘आंनददायी शनिवार’ यादगार केला.
निवडणूक, लोकशाही, मतदान यासारख्या संकल्पना शालेय वयात विद्यार्थ्यांना समजाव्यात, यासाठी भजेपार येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रकियेत सहभागी होत शाळेच्या मुख्यमंत्र्याची व मंत्रिमंडळाची निवड केली. ईव्हीएम अँपच्या माध्यमातून गुप्त मतदान निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत सगुण वासनिक व तृप्ती बोपचे यांची शाळा मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.
भारतीय लोकशाहीत निवडणूक व मतदान प्रक्रियेला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही आणि निवडणूक मतदान प्रक्रियेबद्दल माहिती व्हावी, त्यांना मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, यासाठी शाळेच्या वतीने शाळेचा मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक घेण्यात आली, अशी माहिती शिक्षिका भाग्यश्री रेवडेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. सगुण वासनिक, प्रांशु पटले, सुरज मसराम, आदर्श पटले, तृप्ती बोपचे, तृप्ती रहांगडाले, संध्या अंबुले, प्रियांशू बघेले हे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक रामेश्वर बावनकर यांनी काम पाहत निकाल जाहीर केला. निवडणूक केंद्र अध्यक्ष म्हणून रोहिणी सोनेवाने, तर मतदान अधिकारी म्हणून श्रुती चौधरी, आदित्य बघेले, सोहम सोयाम यांनी काम पाहिले. मतदान कसे करायचे याबाबतची माहिती शिक्षक तानसेन जमईवार यांनी विद्यार्थ्यांना दिली. ईव्हीएम मशीनसाठी अॅप तयार करून त्यावर बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटसह उमेदवारांचे फोटो आणि नावे समाविष्ट केली होती. सर्व प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षकांनी प्रशासनाची भूमिका पार पाडली. केंद्रप्रमुख ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेची जाणीव : मुख्याध्यापक बावनकर
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव यावा, लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहत मोबाईल अॅपमधील ईव्हीएम मशिनद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची बीजे पेरली गेली. निवडणूक प्रक्रियेबाबत कृतिशील अनुभव मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक रामेश्वर बावनकर यांनी बोलताना दिली.