GRAMIN SEARCH BANNER

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात मुभा मिळावी; चक्रभेदी सोशल फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय व्हावी आणि विधवा व एकल महिलांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांना प्रत्यक्ष भेटीत देण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी विधवा आणि एकल महिलांच्या समस्यांबाबत सखोल चर्चा केली. वैदेही सावंत यांनी आपल्या १२ वर्षांच्या प्रशिक्षक पदाचा अनुभव आणि २२ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा सांगत, चक्रभेदी फौंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

यामध्ये विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू, शिव्यामुक्त समाज अभियान, शैक्षणिक मदत आणि मोफत रोजगार साहित्य वाटप यांसारख्या कार्याचा समावेश आहे. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी जिंदाल यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विधवा व एकल महिलांसाठी एकत्रित कार्यक्रम घेण्याचे संकेत दिले. तसेच, बालसंगोपन आणि निराधार पेन्शन योजनेचा लाभ लाभार्थ्यांना नियमित मिळण्यासाठी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मात्र, समाजसेवकांना मोफत प्रवास पास आणि विश्रामगृह सवलत देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनात विधवा महिलांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ व्हावी आणि ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावरील आराखड्यामध्ये या घटकासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेच्या दिपाली गावडे आणि संपदा राणा उपस्थित होत्या. आपण करत असलेल्या समाजकार्याला प्रशासकीय पाठबळ मिळावे आणि गरजू महिलांना सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने हे निवेदन देण्यात आल्याचे वैदेही सावंत यांनी यावेळी नमूद केले.

Total Visitor Counter

3350669
Share This Article