सचिन यादव / धामणी
संपूर्ण देशभर नवरात्रीचा उत्सव भक्तिभावात रंगत असताना संगमेश्वर तालुक्यातील सायले येथे चित्रकार सारिका पांचाळ यांनी कुंचल्यातून देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडवले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या जलरंग चित्रांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मूळ मुंबईच्या असलेल्या सारिका यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून BVA (Bachelor of Visual Arts) ही पदवी घेतली आहे. शालेय वयापासूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली होती. कंपोझिशन आणि निसर्गचित्रे हे त्यांचे आवडते विषय असून, महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत.
विवाहानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्या संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे वास्तव्यास असून, तिथेच आपली कला सातत्याने जोपासत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी देवीच्या चार महत्त्वाच्या रूपांचे – सुवर्णतारा, कृष्णतारा, शैलपुत्री आणि कालरात्री – जलरंगात मनोवेधक चित्रण केले आहे.
सारिका यांनी सांगितले की,
सुवर्णतारा रूप भक्तांना सौभाग्य आणि स्थैर्य प्रदान करणारे आहे.
कृष्णतारा रूप आक्रमक असून वाईट शक्तींचा नाश करते.
शैलपुत्री ही राजा हिमावताची कन्या व देवी सतीचा अवतार मानली जाते.
कालरात्री हे माता दुर्गेचे भयंकर रूप असून, राक्षस आणि अधर्माचा संहार करते.
या सर्व चित्रांना जलरंगात विशेष बारकावे देत त्यांनी देवीच्या शक्ती, सौंदर्य आणि कलेचा अप्रतिम संगम साकारला आहे. स्थानिक रसिकांनी या चित्रांचे मन:पूर्वक कौतुक केले असून, नवरात्र उत्सवात ही प्रदर्शनी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सायले : नवरात्रीत चित्रकार सारिका पांचाळ यांची देवीच्या विविध रूपांची जलरंग प्रदर्शनी
