महसूल खात्याचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी काढले फर्मान
रत्नागिरी: यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये आणि कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांचे वाढदिवस किंवा इतर कोणतेही वैयक्तिक समारंभ साजरे करता येणार नाहीत. महसूल खात्याचे जमावबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत नुकतेच एक परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांसाठी फर्मान जारी केले आहे. कार्यालयीन वेळेत असे समारंभ साजरे करणे ही बाब अनुचित असून, यामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी ताटकळत थांबावे लागते, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. दिवसे यांनी काढलेल्या या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, “शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत वैयक्तिक समारंभ जसे की वाढदिवस वगैरे साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. असे समारंभ साजरे करणे योग्य नाही.” यापुढे अशी अनुचित बाब घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
वाढदिवसासारखे वैयक्तिक समारंभ कार्यालयीन वेळेत साजरे केले जात असल्याने कामानिमित्त आलेल्या अभ्यागतांना आणि नागरिकांना कामासाठी तिष्ठत राहावे लागते. अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमानुसार उचित नसल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे. यापुढे असे कार्यक्रम कार्यालयीन वेळेत व शासकीय कार्यालयात होणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. हे पत्रक भूमी अभिलेख कार्यालयांना पाठवून देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शिस्त येणार असून, नागरिकांची गैरसोय टळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.