GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : आरटीओ कार्यालयाजवळ मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी/ तुषार पाचलकर: मुंबईहून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या १२६१९ क्रमांकाच्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसची धडक लागून एका मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जुलै २०२५ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळ घडली. या घटनेने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांवर बिबट्या आडवा आल्याने भरधाव वेगात असलेल्या मच्छीगंधा एक्स्प्रेसची त्याला धडक बसली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी रेल्वे पोलीस दलाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना कळवले. माहिती मिळताच प्रकाश सुतार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री ११ वाजता घटनास्थळी धाव घेतली.

पाहणी केली असता, मृत बिबट्याचे शरीर रेल्वे रुळांच्या बाजूला पडलेले आढळले. बिबट्याची मान धडावेगळी झाली होती, खालचा जबडा तुटलेला होता आणि उजवा डोळा बाहेर आल्याचे विदारक दृश्य होते. मृत बिबट्या मादी जातीचा असून, तिचे वय अंदाजे दोन ते तीन वर्षांचे असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन विभागाने तात्काळ मृत बिबट्याचा ताबा घेतला आणि या घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांना दिली. २५ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांच्याकडून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, सर्व अवयवांसह मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला.

या बचावकार्यात रेल्वे पोलीस विभागाचे सतीश विधाते (पीआयआरपीएफ), आर. एस. चव्हाण (एएसआय), प्रवीण कांबळे (कॉन्स्टेबल), अमर मुकादम, कमलेश पाल, व्ही. एस. पवार तसेच निसर्गप्रेमी रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव यांनी सक्रिय सहभाग घेतला. वन विभागाकडून परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल (पाली) न्हानू गावडे आणि वनरक्षक (रत्नागिरी) शर्वरी कदम हे उपस्थित होते. विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण बचावकार्य पार पडले.
वन विभागाने अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Total Visitor Counter

2455622
Share This Article