रत्नागिरी: एमआयडीसी (MIDC) परिसरातील वेरॉन कंपनीजवळ गुरुवार संध्याकाळच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळेत एक १२ चाकी कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुख्य रस्त्यावरील कामामुळे आणि खड्ड्यांमुळे सध्या याच मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना या अचानक झालेल्या कोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील वेरॉन कंपनीसमोर १२ चाकी कंटेनर मागे घेण्याचे काम सुरू असताना अचानक या वाहनाचा गिअर लॉक झाला. कंटेनर नेमका रस्त्याच्या मध्ये आडवा उभा राहिल्याने रस्त्यावरची ये-जा पूर्णपणे थांबली. सध्या रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे, तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रेल्वे स्टेशन, मिरजोळे, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी या भागातील नागरिक शहरातील बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी एमआयडीसी मार्गाला प्राधान्य देत आहेत.
संध्याकाळची वेळ म्हणजे कार्यालये आणि कंपन्या सुटण्याची असते. त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठी गर्दी असते. नेमक्या याच वेळेत कंटेनरमुळे वाहतूक खोळंबल्याने शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन् तास वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने, अनेक वाहनधारकांना नाइलाजाने आपली वाहने वळवून पर्यायी मार्गाने बाजारपेठ गाठावी लागली. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एमआयडीसीत अवजड वाहनांच्या पार्किंग आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत यावेळी अनेक प्रवाशांनी व्यक्त केले. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रत्नागिरी एमआयडीसीत १२ चाकी कंटेनरमुळे वाहतूक ठप्प; वाहनधारकांना मनस्ताप
