राजापूर : शहरातील ओगलेवाडी येथे राहणाऱ्या कै. सौ. सुनीता ठाकूर देसाई (वय ६८) यांचे आज सकाळी ६.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजापूर व पंचक्रोशीतील समाजमनाला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुनीता ठाकूर देसाई या राजापूर अर्बन बँकेच्या माजी संचालिका होत्या. याशिवाय त्या राजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका म्हणूनही कार्यरत होत्या. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या पतींचे नाव अनिल ठाकुरदेसाई, हे देखील राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक होते.
सुनीता ठाकूर देसाई यांचा परिसरात जनसंपर्क दांडगा होता. राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या त्या सासूबाई होत.
त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ, हळवे आणि तितकेच कर्तव्यदक्ष होते. सामान्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून, योग्य मार्ग काढण्याचे, तसेच परखडपणे वरिष्ठांना चुका दाखवून देण्याचे त्यांचे कसब नेहमी वाखाणले गेले. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे गाढे ज्ञान होते. त्यांनी अनेकदा प्रवचनांद्वारे समाजप्रबोधन केले. आपल्या उत्तर आयुष्यात त्यांनी अनेक महिलांना संस्कृत गीतेचे श्लोक, त्यांचे मराठी अर्थ समजावून दिले. श्लोकांना चाल लावून ते सहजगत्या शिकविण्यात त्यांना आनंद मिळत असे.
राजन ठाकुरदेसाई हे त्यांचे पुत्र असून, ते अमेरिकेतील प्रख्यात सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहेत. आईच्या आजारपणामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून राजापूर येथे आले आहेत. श्री मंगल कार्यालयाचे मालक श्रीकांत ताम्हणकर यांची मोठी बहीण म्हणजेच सुनीता ठाकूर देसाई होत.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि मोठा कुटुंब परिवार आहे.
अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून ओगलेवाडी येथून दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत निघणार आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या माजी संचालिका, माजी नगरसेविका सुनीता ठाकूर देसाई यांचे निधन
