रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक अभिमानास्पद घटना घडली असून, थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी जिल्ह्यतील दोन मान्यवरांची भारतीय संघात निवड झाली आहे. रत्नागिरीचे सुपुत्र शैलेश जाधव आणि चिपळूणचे सुपुत्र नंदकुमार शिंदे यांनी ही गगनभरारी घेतली असून, त्यांची अनुक्रमे आंतरराष्ट्रीय पंच आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा झळकले आहे.
भारतीय फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग महासंघातर्फे थायलंडमधील पटाया येथे ‘जागतिक प्रो अप शो बेस्ट इंटरनॅशनल बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिप २०२५’ आणि ‘आशियाई चॅम्पियनशिप २०२५’ या प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा क्रीडा कुंभमेळा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात रत्नागिरीतील शैलेश जाधव यांची आंतरराष्ट्रीय पंच म्हणून वर्णी लागली आहे, तर चिपळूण येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर नंदकुमार शिंदे हे या स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची (कोच) महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
शैलेश जाधव यांचे या क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक कार्यवाह म्हणून सलग २५ वर्षे धुरा सांभाळली असून, सध्या ते संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते राष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणूनही ओळखले जातात. दुसरीकडे, चिपळूणचे नंदकुमार शिंदे हे स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू असून सध्या ते जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या दोघांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक स्तरावरील या निवडीबद्दल जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन रत्नागिरी, फिनिक्स जिम तसेच जिल्ह्यातील अनेक क्रीडाप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, थायलंडमधील त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





