एक समान ५०० रुपये शुल्क, पोस्टाद्वारे किंवा पीडीएफ प्रत मिळणार
मुंबई: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कशीटची दुय्यम प्रत, मूळ प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र किंवा त्यात दुरुस्तीसाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.
आता हे कायमाचे थांबणार असून शिक्षण मंडळाने ही महत्त्वाची कागदपत्रे आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी प्रमाणपत्र हरविले किंवा त्यात दुरुस्ती करायची झाल्यास विद्यार्थ्यांना अनेक दिवस विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ, पैशासोबत मानसिक त्रासाचा सामना विद्यार्थ्यासह पालकांना करावा लागत होता. आता विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करून घरबसल्या हे सर्व कागदपत्रे मिळवू शकतो. या निर्णयामुळे सही-शिक्क्यासाठी होणारी धावपळ थांबेल आणि लाखो विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचणार असल्याने मोठा फायदा होणार आहे.राज्य मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आधार क्रमांक टाकून ओटीपी पडताळणी, वर्ष, परीक्षेचा प्रकार (एसएससी/एचएससी) आणि प्रमाणपत्राचा प्रकार निवडणे. शुल्क भरून अर्ज सबमिट केल्यावर पीडीएफ प्रत तत्काळ मिळेल, तर मुद्रित प्रत काही दिवसांनी पोस्टाने घरपोच मिळणार आहे.
शिफारसपत्राची गरज नाही
आता या कागदपत्राची मागणी करताना शाळेकडून शिफारसपत्र, मुख्याध्यापकांची सही किंवा मंडळ अधिकाऱ्यांचे शिक्के लावण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पडताळणीवर आधारित आहे.
सन १९९० पासूनचा डेटा राज्य मंडळाने सन १९९० नंतरच्या सर्व दहावी-बारावीच्या नोंदी डिजिटल केल्या आहेत. त्यामुळे १९९० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइनद्वारे प्रमाणपत्र मिळविणे सुलभ झाले आहे.
दहावी, बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाइन मिळणार !






