GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणची मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर; अखंडित वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज

Gramin Varta
13 Views

रत्नागिरी : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने महावितरण कंपनीने कंबर कसली असून, संपूर्ण जिल्ह्यात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आहेत. मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पावसाळ्यातील संभाव्य तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी महावितरणने सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातील वीज वाहिन्या आणि उपकरणांची स्थिती सुधारण्यावर भर दिला आहे.
या मोहिमेअंतर्गत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील ९४१ वीज वाहिन्यांच्या परिसरात वाढलेल्या आणि तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने ३९ ठिकाणच्या सैल झालेल्या वीज तारा ओढून त्यांचे ताण निश्चित करण्यात आले असून, २९ ठिकाणी वीजवाहिन्यांच्या गाळ्यांना संरक्षक गार्डींग बसविण्यात आले आहे. जुन्या आणि जीर्ण झालेल्या सुमारे १० किलोमीटर अंतराच्या वीज तारा बदलून त्या ठिकाणी नवीन तारा टाकण्यात आल्या आहेत. यंत्रणेचा कणा असलेल्या वीज खांबांचीही तपासणी करण्यात आली असून, ३२ वाकलेले किंवा गंजलेले खांब बदलून त्या जागी नवीन खांब उभे करण्यात आले आहेत.

विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये प्रामुख्याने ३०० पीव्हीसी स्पेसर्स लघुदाब वाहिनीत बसविण्यात आले असून ६३ ठिकाणी जंपर बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ५७ पिन, ३२ डिस्क आणि १९ स्टे इन्सुलेटर बदलून वीज वहन प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात आली आहे. गावपातळीवर वीज वितरण करणाऱ्या रोहित्रांचीही विशेष काळजी घेण्यात आली असून २८ खराब रोहित्र पेट्या बदलण्यात आल्या आहेत, तर ६५ रोहित्र वितरण पेट्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती पूर्ण झाली आहे. रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, सिलीका जेल बदलणे आणि तेल गळती रोखणे यांसारखी तांत्रिक कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढण्यापासून ते बॅटरी बॅकअप आणि आयसोलेटर अलाइनमेंट तपासण्यापर्यंतची सर्व कामे महावितरणने वेळेत पूर्ण केली आहेत.

पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने पुरेशी तयारी केली असून रोहित्र ऑईल, वीज खांब आणि इन्सुलेटर यांसारख्या आवश्यक साहित्याचा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता ७८७५७६५०१८ हा नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ग्राहक १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. महावितरणच्या या पूर्वतयारीमुळे यंदाच्या पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3315593
Share This Article