GRAMIN SEARCH BANNER

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Gramin Varta
12 Views

मुंबई: ”स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!”या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटाचा टिझर नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून प्रस्तुती झी स्टुडिओजची आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ”माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, ”झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे समीकरण कायमच यशस्वी राहिलेलं आहे. मराठीसाठी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या चित्रपटाशी जोडल्या गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसून जगण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणारा आहे. “

आपल्या भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थ बोडके म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडू शकेन, असा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेसाठी आपण अभ्यास करतोच, परंतु या चित्रपटातील माझा प्रवास विशेष होता. यात दाखवलेले शिवाजी महाराज हे प्रचंड संतप्त आहेत. कारण आज आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची जी स्थिती आहे ती पाहून कोणाच्याही मनात राग निर्माण होईल. हे वास्तव जेव्हा या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या समोर आलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो, जर आज महाराजांनी ही परिस्थिती पाहिली असती, तर त्यांची भूमिका काय असती? हाच भाव मी या चित्रपटातील माझ्या अभिनयातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आता उत्सुकतेने करत असून, पहिली झलक पाहून हा चित्रपट वर्षातील सर्वात चर्चेचा ठरणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Total Visitor Counter

2650397
Share This Article