GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी कारने महिलेला चिरडले; फरार कार चालक पोलिसांच्या ताब्यात

Gramin Varta
1k Views

रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव कारने धडक देऊन चिरडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून सोमवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अखिल ताजुद्दीन पटेल (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. रविवारी (दि. १८) सायंकाळी घडलेल्या या भीषण अपघातामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

या अपघातात सुनिता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. सुनिता या रविवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास लाला कॉम्प्लेक्स परिसरातून दुचाकी (एमएच-०८ एयू-६६३३) वरून जात होत्या. त्यावेळी संशयित अखिल पटेल याने आपल्या ताब्यातील कार (एमएच-०३ झेड-५६६२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या अंगावरून कार गेली. अपघातानंतर संशयित चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

गंभीर जखमी झालेल्या सुनिता साळवी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध घेत सोमवारी अखिल पटेल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यशस्वी महिला व्यावसायिक हरपल्याने हळहळ

सुनिता साळवी या गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरी शहरात ब्युटी पार्लर व्यवसायात कार्यरत होत्या. रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. शहरात त्यांचे दोन पार्लर असून, त्यांनी मोठ्या कष्टाने हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. त्यांच्या अपघाती निधनाने मित्रपरिवार व ग्राहकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू व मुलगी असा परिवार आहे.

Total Visitor Counter

3210464
Share This Article