खेड : येथील बाजारपेठ परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी वाळंज गल्ली मध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत छापा टाकून तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ३९२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ रोजी दुपारी १३.१५ वाजताच्या सुमारास पिताश्री इमारतीच्या तळमजल्यातील रुममध्ये काही व्यक्ती पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले फिर्यादी महेश महेंद्र जाधव (पोहवा/१२५६) यांना मिळाली.
या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी जितेंद्र वसंत घोडे (वय ५५), संतोष भिकु शिगवण (वय ५२), सतिश शंकर इंगवले (वय ४२), आणि संतोष नारायण शिगवण (वय ५६) हे चार आरोपी पैसे लावून तीनपत्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी या चौघांनाही जागीच ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी ₹ ३९२०/- रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात आलेले ५२ पत्ते, ‘Indigo ५५५ slim’ लिहिलेला आणि नवीन १२ कॅर्केट असलेला पत्यांचा बॉक्स, तसेच लाकडी गोलाकार टेबल आणि लाल रंगाच्या चार प्लॅस्टिकच्या खुर्च्या असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
खेडमध्ये जुगारावर धाड; चौघेजण ताब्यात!
